अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत.
मात्र, येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. मात्र, त्यालाच बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती.’ शनिवारी शिर्डी विमानतळावर आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंबंधी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पहाता मला राजकारणापेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता आहे. राज्यात सध्या नो गव्हर्नन्स अशीच अवस्था पहायला मिळते आहे.
अशी अवस्था राज्याने कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे. येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे.
महाराष्ट्राचा जो नावलौकीक आहे, त्याला कुठेही बट्टा लागता काम नये, याची खरी काळजी करण्याची गरज आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.