अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील साखर कारखाने चांगलेच चर्चेत आहे. आयकर विभागाच्या धाडी असो नाहीतर ईडीची कारवाई यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.
यामुळे बडे बडे राजकारणी चर्चेच्या भोवऱ्यात अडकले देखील होते. मात्र नुकतेच एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात अजूनही बारा साखर कारखाने लिलावात निघणार आहेत, ज्यांना हे कारखाने चालवायला घेण्याची ऐपत असेल, कारखाने चालवायचे असतील त्यांनी ते जरूर घ्यावेत असे आवाहन करीत भाजपला टोला हाणला आहे.
राज्यात भाजपने सुरू केलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या मोहिमेदरम्यान सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करून कमी पैशात साखर कारखाने घेतल्याची टीका सुरू केली आहे.
अशातच अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून विरोधकांना देखील सत्ताधाऱ्यांकडून सणसणीत उत्तर मिळाले आहे.
दोन दिवसापूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीचे सोमेश्वर विकास पॅनल निवडून आले.
या निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी गळीत हंगामाचा शुभारंभ असल्याने अजित पवार सोमेश्वर नगर येथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी साखर कारखान्यांच्या संदर्भातील ही माहिती दिली.
ही माहिती देताना त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केले. राज्यातील अजूनही बारा साखर कारखाने लिलावात या प्रक्रियेत असून त्यांची टेंडर्स निघणार आहेत.
ज्यांना धमक असेल, ज्यांना ते कारखाने चालवायची इच्छा असेल त्यांनी ते चालवायला घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले.