बिग ब्रेकिंग : शिवसेना-भाजप पुन्हा युती होणार का ? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत जाणार, असे तर्क लावले जात असतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना शिवसेना भाजप मैत्रीबाबत विचारणा करण्यात आली. दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची किती शक्यता आहे, असे विचारले असता आपल्या खास शैलीत ठाकरे यांनी उत्तर दिले.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात होते. त्यांच्याकडे बोट दाखवत ‘मी या दोघांच्या मध्ये बसलो आहे.

तेव्हा तुम्हीच सांगा आता यांना सोडून मी कुठे आणि कसा जाणार?, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. या उत्तराने पत्रकारांमध्येही हंशा पिकला. मात्र पुन्हा हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी तशी शक्यता फेटाळून लावली.

३० वर्षे आम्ही युतीत एकत्र असताना काही घडले नाही तर आता काय घडणार आहे?, असा सवाल करत महाविकास आघाडी भक्कम असल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

अहमदनगर लाईव्ह 24