file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून लवकरच ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. राज्याच्या शालेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

या अभियनांतर्गत मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही चांगल्या शाळेची ओळख आहे आणि ते पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वराज्य जननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरु करत आहोत, असे गायकवाड यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत मोडकळीस आलेल्या जुन्या शाळांची पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील 718 शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी आणि 1050 शाळांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

यासाठी अभियानासाठी सरकारकडून 200 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील शाळा झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये राज्यातील इतर विभागातही या उपक्रमाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.