अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात अद्यापही आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता गणेशोत्सवात मंडळाच्या गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष मुखदर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर विरोधकांकडून आंदोलन केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने २४ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचा आदेश दिला आहे.
जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याची कारणे आदेशात नमूद केली आहेत. पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार कलम ३७ (१) (३) नुसार म्हणजेच जमाव व शस्त्रबंदीचा आदेश देण्यात आला आहे.
जमावबंदी काळात बंधने –
पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, मिरवणूक काढणे, लाठ्या काठ्यांसह अन्य शस्त्र जवळ बाळगणे, मोर्चे, आंदोलन करणे, घोषणा देणे, प्रक्षोभक भाषण करणे,
सभ्यता अथवा नितीमत्तेला धोका पोहोचेल असं कोणतंही कृत्य करणे, अशा गोष्टींना जमावबंदी आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता
सरकारच्या मिरवणूक मनाई व प्रत्यक्ष मुखदर्शन न घेणे बाबतच्या आदेशाविरुद्ध विविध संघटना, राजकीय पक्ष यांची आंदोलने होऊ शकतात.
त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करुन प्रशासनास वेठीस धरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष, कामगार संघटनांतर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रस्ता रोको कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१० ते २४ सप्टेंबर जमावबंदी –
या पार्श्वभूमीवर अहमनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणन पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये,
यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश १० ते २४ सप्टेंबर या काळात लागू राहणार आहे,’ असं आदेशात म्हटलं आहे.