अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-झोमॅटोने गेल्याच महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये आपले आयपीओ आणले होते. ही स्कीम कंपनीने बाजारात आणल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळे आपल्याला पहिल्या तिमाहीत तोट्याला सामोरे जावे लागले असल्याचे झोमॅटोने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
पहिल्या तिमाहीत ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोला तब्बल 359 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात 99.8 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
कंपनीच्या उत्पन्नापेक्षा खर्चात झालेली वाढ हे कारण या तोट्यामागे असल्याचे झोमॅटोने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी झोमॅटोला 403 मिलियन ऑनलाईन ऑर्डर्स मिळाल्या होत्या.
त्याचा आकडेवारीत हिशोब केला, तर तो 11,221 कोटी रुपये एवढा आहे. गेल्या वर्षी झोमॅटोने दोन लाख डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून भारतभरात जवळपास 500 शहरांत फूड डिलिव्हरी केली होती. झोमॅटोला या तिमाहीत 844.4 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
पण या तिमाहीत कंपनीच्या खर्चात 1,259.7 कोटी रुपयांची वाढ झाल्यामुळे हा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी हाच महसूल 266 कोटी रुपये एवढा होता. झोमॅटोच्या महसूलात गेल्या वर्षी 96 टक्क्यांची वृद्धी झाली होती.
सन 2019 साली झोमॅटोचा महसूल हा 1398 कोटी रुपये एवढा होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली त्यामध्ये वाढ होऊन तो 2743 कोटी रुपये झाला.