अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. ओबीसी आरक्षण नसल्यास या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर आज राज्यपालांनी त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. ओबीसी आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसी राजकीय आरक्षण देण्याबाबतच्या विधेयकावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.
त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य सरकारने विधिमंडळात एक विधेयक मंजूर केले होते.
हे विधेयक ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुकाच नकोत याबाबतचे होते. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील पाठिमागील काही महिन्यांपासूनचे सख्य पाहता राज्य सरकारने मंजूर केलेल्या
विधेयकावर राज्यपाल स्वाक्षरी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे या विधेयकाचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे.
यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्यपालांनी विधेयकावर सही केली आहे. आज त्यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
छगन भुजबळ यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली आहे. सर्व बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्यपालांनी या विधेयकावर सही केली आहे. आता हा विषय संपलेला आहे.