मोठी बातमी : अनलॉकच्या नियमावलीत बदल,सगळे जिल्हे …..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- सध्या राज्यात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस करोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

याआधीच्या मूळ नियमावलीनुसार दर गुरुवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्बंध कमी किंवा जास्त करायचे, यासंदर्भात निर्णय घेतला जाई.

ते निर्बंध त्यापुढील सोमवारपासून अंमलात आणले जात. मात्र, आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल.

त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आज जारी करण्यात आलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत :-

  • पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे,
  • यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे.
  • टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.
  • हवेमधून पसरू शकणाऱ्या करोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे.
  • मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे. करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे.
  • गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे.
  • कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या.
  • जेणेकरून ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील.
अहमदनगर लाईव्ह 24