अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे ४५ रुग्ण आढळले असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्य एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या रविवारच्या अहवालात हे स्पष्ट झाले.
डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक २० रुग्ण १९ ते ४५ वयोगटात आढळले असून त्या खालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १४ रुग्ण आहेत.१८ वर्षांखालील ६ बालके आणि ६० वर्षांवरील ५ रुग्ण आहेत.
डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले असून पुण्यात ३ तर औरंगाबाद,बीड जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. कोविड प्रतिबंध आणि नियमित उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत अाहे.
जिनोमिक सिक्वेंसिंग दोन प्रकारे करण्यात येत असून त्यासाठी राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयांची सेंटीनल सेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवाड्याला १५ नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी संस्था विज्ञान संस्थेस पाठवते.
तर जनुकीय क्रमनिर्धारणासाठी सीएसआयआर अंतर्गत संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँड इंटीग्रेटेड बायोलॉजी संस्थेशी राज्य शासनाने करार केला असून या नेटवर्कव्दारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते.