अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालणारी श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा करोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी भाविकांना कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे.
मात्र, प्रथा-परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणार्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील, अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे नाथ पंथातील कानिफनाथांची समाधी आहे.
या ठिकाणी होळी ते गुडी पाड्व्यादरम्यान 15 दिवसांची मोठी यात्रा भरते. यासाठी राज्यातील भटक्या समाजाचे लोक यात्रेनिमित्त येतात. विशेषतः गोपाल, वैदू, कैकाडी कोल्हाटी, कुंभार या समाजातील मंडळी यात्रेसाठी दूरवरुन येतात. यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे.
यावेळी तहसिलदार वाडकर म्हणाले, राज्यातील भटक्या समाजाची पंढरीची यात्रा म्हणून याकडे पाहिले जाते. अठरापगड जातीचे बांधव यात्रेसाठी येऊन येथे परंपरेप्रमाणे धार्मिक विधी करतात.
गावाची सार्वजनीक होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला असून या दिवशी गोपाळ समाजातील मानकरी, निवडक विश्वस्त, पुजारी आदींच्या उपस्थित होळी पेटविली जाईल. अन्य भाविकांना गावात प्रवेश मिळणार नाही. मढीला येणार्या सर्व बाजूंच्या रस्त्यावर गावाच्या हद्दीवर पोलीस व देवस्थान समितीतर्फे बॅरिकेटींग करून यात्रेकरुणांना गावात प्रवेश मिळणार नाही.
यात्रेनिमित्त सर्व व्यवसाय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. गर्दीच्या दिवशी म्हणजे चतुर्थी, रंगपंचमी व षष्ठीच्या दिवशी संचार बंदी आदेश जारी करायचा, यात्रा पूर्ण बंद करायची की देवाच्या काठ्या बरोबर पाच व्यक्तींना प्रवेश द्यायचा याचा निर्णय 15 मार्चनंतर जिल्हाधिकार्यांकडून घेतला जाईल.
त्यांच्याकडून मिळणार्या आदेशानुसार यात्रेच्या पुढचा टप्प्या विषयी निर्णय घेतला जाईल. देवस्थान समितीच्या सर्व कर्मचार्यांची यात्रेपूर्वी करोना चाचणी केली जाईल. दरवर्षी एसटीकडून यात्रेसाठी सोडण्यात येणार्या जादा गाड्या यावर्षी सोडण्यात येणार नाहीत.
कोणीही भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये. यात्रेपूर्वी गावात आरोग्य विभागामार्फत धुरळणी, फवारणी व गावातील पाणवठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.