अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- पाच वर्षाची मुदत संपलेल्या मात्र कोरोना साथीमुळे निवडणुका रखडलेल्या राज्यातील १३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.
त्याबाबत मतदार याद्या बनवण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी जारी केले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस विलंब नको म्हणून मुदत संपूनही ३ महिने जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर लगेच कोविडची महासाथ आली.
निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी मार्च २०२० आणि त्यानंतर एप्रिल २०२१ अशी दोनवेळा कोविडच्या कारणांमुळे बँकांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या राज्यात कोरोनाची रुग्णवाढ मंदावली आहे.
त्यामुळे पाच वर्षे मुदत संपलेली आहे, व ज्या बँकांच्या संचालकांची मुदत संपून १५ महिनेपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे, अशा बँकांच्या मतदार याद्या तयार करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. याद्या बनवणे, आक्षेप नोंदवून घेणे आणि सुनावणी घेणे व अंतीम मतदार याद्या बनवणे याला किमान २५ दिवस अवधी लागतो.
तसेच बँकांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर रद्द करण्यात आली होती, तेथून पुढे निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यात ३१ जिल्हा बँका असून पैकी १३ बँकांची निवडणुका लवकरच होईल. त्यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, , उस्मानाबाद या जिल्हा बँकांचा समावेश आहे.