मोठी बातमी : आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या गर्दीत साजरा झाला होता. मात्र यावरून ते आता अडचणीत सापडले आहेत.

आ.जगताप यांनी राज्य सरकारनेच घालून दिलेले कोविड विषयक सर्व नियम मोडले. त्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी,’ अशी मागणी येथील ‘आरटीआय’ कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संदीप भांबरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘आमदार संग्राम जगताप यांचा १२ जूनला वाढदिवस होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो आयुर्वेद महाविद्यालयात साजरा केला होता.

यावेळी करोना विषयक नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. असे असूनही या कार्यक्रमात लहान मुलांनाही धोकादायक पद्धतीने सहभागी करून घेण्यात आले होते.

याचे पुरावे आणि फोटो आमच्याकडे आहेत. वास्तविक पहाता मे महिन्यात आमदार जगताप आणि महापालिका आयुक्तांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील नागरिकांवर एक महिन्याचे कडक निर्बंध लादले होते.

त्यामध्ये लोकांचे हालही झाले. मात्र, जनतेवर निर्बंध लादण्यास पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी स्वत:चा वाढदिवस साजरा करताना नियमांकडे दर्लक्ष करून काय साध्य करू इच्छीत आहेत?

सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार लोकप्रतिनिधीने असा नियम मोडून वाढदिवस साजरा केल्याने समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो.

नियम फक्त सामान्यांसाठी असतात, सत्ताधारी आमदारांसाठी नाही, असा संदेश यातून जाऊ शकतो. त्यामुळे सामान्य जनताही नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करू शकते. यातून संसर्ग पसरण्याचा मोठा धोका आहे.

सरकारकडून सामान्यांना नियम पाळण्यास भाग पाडले जाते, मग लोकप्रतिनिधींनाही नियमांची जाणीव करून दिली पाहिजे.

त्यासाठीच जगताप यांचे आमदारपद रद्द करावे, अशी मागणी भांबरकर यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24