अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंबर कसायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख मंत्री आणि पदाधिकारी यांनी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निवडणूका एकत्रित लढण्याबाबत विचार करण्याचे संकेत दिले.
राज्यात 2022 साली होणार्या तब्बल 18 महापालिका, 27 जिल्हा परिषद आणि 200 च्या घरात नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण आढावा बैठक बोलावली होती.
आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना ईडीमार्फत येणाऱ्या नोटीसा आणि चौकशा पाहून भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची एकजूट करण्याची गरज असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या बैठकीतून मिळाले आहेत.
मंत्र्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आढाव्यावर अधिक वेळ चर्चा न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरच या बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्याकडे ज्या जिल्ह्याची जबाबदारी आहे, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कशी आहे,
याची माहिती पवार यांनी जाणून घेतली.तसेच निवडणूक तयारीसाठी प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला आहे. काही महानगरपालिकांवर भाजपाचे प्राबल्य आहे. अशा ठिकाणी एकत्र येण्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा केली जाईल. तर काही ठिकाणी परिस्थिती बघून आघाडीचा निर्णय होईल.
तसेच न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसींच्या राखीव जागा कमी झाल्या आहेत. घाईगडबडीत निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नये, असे मत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले.