मोठी बातमी ! राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण कि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.

यामुळे आता राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या होत्या.

त्यात सुधारणा करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला. यावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली. राज्यपालांनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानले. आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होऊ शकतं.

हा अध्यादेश कायमस्वरुपी पुढे न्यायचा असेल तर तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावा लागेल. मात्र, आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तीन महिने हा अध्यादेश लागू असणार आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagarlive24 Office