ताज्या बातम्या

Jitendra Awhad : मोठी बातमी ! जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा

Published by
Ahmednagarlive24 Office

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांमध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत राजीनाम्याविषयी माहिती दिली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

जयंत पाटील म्हणाले, आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी मी प्रयत्न केले. त्यांना बराच वेळ समजावलं. पण असे खोटे गुन्हे दाखल होणं त्यांच्या मनाला लागलंय. जो गुन्हा कधी केलाच नाही, त्यासंदर्भात गुन्हा दाखल होत असेल तर योग्य नाही.

या घटनेचा व्हीडिओ सर्वत्र उपलब्ध आहे. त्यात स्पष्टपणे सगळं दिसतंय. यात कुठेही काही चुकीचं दिसत नाही. तरीही असा गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला. याबाबत मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनीही माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले, माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी मी घाबरणारा नाही. पण विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे, माझ्या तत्वात बसत नाही.

माझा स्वभाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल होणं माझ्या मनाला वेदना देणारा आहे, असे म्हणतानाच जितेंद्र आव्हाड हे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचा राजीनामा सिवकरतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office