मोठी बातमी ! उड्डाणानंतर इंडोनेशियाचं विमान झाले बेपत्ता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. बोइंग 737 प्रकारच्या या विमानात 62 प्रवासी होते.

उड्डाणानंतर काही मिनिटात या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. बोईंग 737-500 या विमानाने रात्री 1:56 वाजता जकार्ताहून उड्डाण केले आणि पहाटे 2:40 वाजता या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या अदिता इरावती यांनी सांगितले.

हे विमान जकार्ता ते इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावरील पश्‍चिम कालिमंतन प्रांताची राजधानी पोंटियानॅककडे जाण्यासाठी निघाले होते. हा प्रवास अंदाजे 90 मिनिटांचा होता, असे एअरलाइन्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या विमानामध्ये 56 प्रवासी आणि 6 असे एकूण 62 जण होते.

राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्था आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समिती यांच्या समन्वयाने शोध आणि बचाव कार्य चालू आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. हे विमान नेमकं कोणत्या दिशेने गेलं याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या विमानाच्या लोकेशनची माहिती मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या विमानाचा शोध घेण्यासाठी अभियान सुरू करण्यात आलं आहे. विमान बेपत्ता झाल्याची बातमी पसरताच या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी जकार्ता आणि पोन्टियानाक्‍स विमानतळावर गर्दी केली आणि विमान वाहतुकीच्या नियंत्रण कक्षाकडून अधिक माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना गराडा घातला.

अहमदनगर लाईव्ह 24