मोठी बातमी ! पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा CET होणार नसल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उद्यापासून बारावीच्या निकालाच्या आधारेच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती.

मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसंच महाविद्यालयांचं पुढील सत्र ऑफलाईन पद्धतीने सुरु व्हावं यासाठी येत्या आठ दिवसात आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CET होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सीईटी परिक्षा या ऑनलाईन होतील. पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24