अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- राज्य बोर्डांनी बारावीच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धतीची योजना लवकरात लवकर तयार करण्याची आवश्यकता आहे.
तसेच १२ वीचा निकाल ३१ जूलैपर्यंत जाहीर करावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिले आहेत. ज्या राज्यांकडे अजून अंतर्गत मूल्यांकन पद्धत तयार नाहीय त्यांना १० दिवसांचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
बारावीचे मूल्यांकन हे दहावी आणि अकरावीच्या निकालाच्या आधारे होईल असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
बारावीचे गुण हे मागच्या परीक्षांच्या आधारे दिले जातील तसेच ३१ जुलैपर्यंत रिझल्टची घोषणा केली जाईल असेही सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
लाखो विद्यार्थी आणि पालकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती.
दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २१ राज्यांनी १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वाधिक महत्त्व आहे आणि त्याबाबत कसलीही तडजोड चालणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या ३०:३०:४० फॉर्म्युल्यावर आक्षेप घेणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. ती याचिका देखील रद्द ठरवत न्यायालयाने मूल्यांकनाची पद्धती योग्य असल्याचं म्हटलं होतं.
या पार्श्वभूमीवर आता न्यायालयानं देशातील सर्वच राज्यांमधल्या बोर्डांना ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचे निर्देश दिले आहेत.