अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून १५ मे पर्यंत निर्बंध कायम आहेत. ठाकरे सरकारकडून आधी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याची शक्यता असून बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये लक्षणीयरीत्या कमी होत आहे. तेव्हा अशा परिस्थितीत 15 मेनंतर राज्यात लॉकडाऊन कायम राहणार की उठवला जाणार? असा मोठा प्रश्न आहे.
राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढीचा दर आता उतरणीला लागला आहे. अनेक जिल्ह्यात आता करोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. तर, काही ठिकाणी मात्र परिस्थिती अजूनही आटोक्यात आली नाहीये. अकोला, अमरावती, नाशिक, सांगली,
बुलडाणा यासारख्या काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे. त्यामुळं राज्यातील लॉकडाऊन वाढणार की उठणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
‘सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याबाबत आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी विचार करतोय. १५ मेनंतर लॉकडाऊन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो व कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो व कोणते निर्बंध कठोर करायचे याचा विचार करावा लागेल.
बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत विचार केला जाईल, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तसंच, लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्स काय शिफारस करत यावर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
देशामध्ये करोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात आलेली असताना महाराष्ट्रातही करोनाबाधितांची संख्या वाढू लागलीय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तिसरी लाट आली की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचसंदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रामध्ये करोनाची तिसरी लाट आली नाहीय ना, अशी शंका आता यंत्रणांनाच येऊ लागल्याचं ठाकूर म्हणाल्या आहेत.
दरम्यान “लॉकडाऊनमुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाऊनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाऊन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपली तयारी सुरु होती.
जम्बो सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे, कामं सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात आता रेमडेसिवीरसाठी पहिल्यासारखी मारामारी नाही,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.