अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात कहर झाला आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असल्याने बाधितांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि उपचार मिळेनासे झाले आहेत.
हीच संधी साधून खासगी हॉस्पिटल्सनी भरमसाट बिले आकारून गोरगरिबांची आर्थिक लूट सुरू केली आहे. आता याच खासगी रुग्णालयांना चाप बसणार आहे.
सर्वसामान्यांची बेकायदशीररीत्या लूट करणाऱ्या रुग्णांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा सूचना लेखा परीक्षकांना करण्यात आल्या आहेत.
महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आरोग्य समितीचे सदस्य व कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक झाली.
कोरोनाच्या संकट काळात रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात असून, याबाबतचे पुरावेही उपलब्ध आहेत. शासनाचे नियम डावलून बिलांची आकारणी शहरातील काही रुग्णालये करत आहेत.
रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून तक्रारी प्राप्त हात असून, अशा रुग्णालयांतील बिले तपासून तत्काळ कारवाई करण्यात यावी,
तसेच फरकाची रक्कम रुग्णांना नंतर न देता बिल कमी करून देणे योग्य होईल, अशी सूचना यावेळी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली.