अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा प्रशासनाने रद्द केली. यात्रेनिमित्त विविध व्यवसायिक, देवस्थान समिती व वाहतुकदारांची मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
मढी येथील रंगपंचमीला यात्रेचा दुसरा टप्पा व मुख्य दिवस असतो. चतुर्थी, पंचमी व नाथषष्ठी अशी तीन दिवस यात्रा भव्य प्रमाणात भरते.
देवाच्या काठ्या म्हणून हजारो काठ्या राज्याच्या विविध भागातून भक्ती भावाने वाजत-गाजत मढी येथे घेऊन मंदिराच्या कळसाला लावून विविध धार्मिक विधी भाविकांकडून केले जातात. यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार ,
मिठाईसह रेवड्यांचा बाजार, नाथ पुजासाहित्य त्यामध्ये कोट्यवधीची उलाढाल होते. राज्याच्या कानाकोपर्यातून कर्नाटक, तेलंगणा, गुजरात राज्यातून भक्त मोठ्या प्रमाणात येतात.एस. टी. बसच्या शेकडो जादा गाड्या नगर विभागामार्फत यात्रा काळात चालवल्या जातात.
मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमिवर यात्रा बंद करून तालुका प्रशासन आणि पोलिसांनी मढीकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स बांधून बंद केले.
वारी पूर्ण करण्यासाठी म्हणून काही भाविक पायी चालत काठी घेऊन आले त्यांनाही मंदिराच्या दिशेने काठी उंचावून कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले.