अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात बिंगो व ऑनलाईन मॅचच्या जुगाराला पेव फुटले असून, हा जुगार चालविणार्या माखिजा बंधूवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे. या जुगाराची संघटित स्वरूपाची गुन्हेगारी असल्याने मोक्कातंर्गत कारवाई करण्याचा आग्रह धरण्यात आला.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, आरपीआय युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, शहराध्यक्ष नईम शेख, जावेद सय्यद, संतोष पाडळे, दिनेश पाडळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात बिंगो व ऑनलाईन सायबर जुगाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. यामध्ये शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील माखिजा बंधू बिंगो नावाचा जुगार संपुर्ण जिल्ह्यात चालवत आहे. हा झटपट स्वरुपाचा जुगार असून, दिवसाला यामध्ये लाखोंची उलाढाल होत आहे.
या बिंगो जुगारचे आयडी सुद्धा महाग स्वरुपात विकल्या जातात. नगर शहरामध्ये बिंगो जुगाराचे चारशे ते पाचशे आयडी विकल्या गेल्या आहेत. सदर आयडी विकण्यासाठी शंभर माणसे कामाला लावलेले आहेत. त्यांना पन्नास टक्के कमिशन दिले जाते. यामागे माखिजा बंधूंचा हात असून, सर्व कामगारांचे सीडीआर कॉल तपासल्यास सर्व पितळ उघडे पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बिंगो व ऑनलाईन सायबर जुगारची सर्व गुन्हेगारी संघटित स्वरूपाची आहे. हे काम करताना गुन्हेगारांचे मोठे संघटन आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनाधिकृत जुगार सर्रास सुरु आहे. बिंगो जुगार चालविणार्या माखिजा बंधूंनी जुगाराच्या जीवावर मोठी संपत्ती कमवली असून, या जुगाराच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनला महिन्याचे हप्ते बांधलेले असल्याने जुगारवर कारवाई होत नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
बिंगो जुगारवर तातडीने गुन्हे शाखे मार्फत कारवाई होणे अपेक्षित असून, संघटित गुन्हेगारी मोक्कांतर्गत माखिजा बंधूवर कारवाई करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.