भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भिक मागण्याची वेळ आणली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅससह जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने शहरात भिक मागो आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने चुकीचे धोरण राबवून प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना भिक मागण्याची वेळ आली असताना सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.

तर वाढवलेल्या महागाईचा जाब विचारण्यात आला. रामवाडी येथील पेट्रोल पंम्पा समोर झालेल्या आंदोलनात केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर सदस्य संतोष पाडळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्याक शहर कार्याध्यक्ष आजीम खान,

शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, अंकुश भोरे, भिम वाघचौरे, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मंगेश गायकवाड, उमेश गायकवाड, दीपक उघडे आदी सहभागी झाले होते.

केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून संपुर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. 2014 पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात महागाई करुन ठेवली आले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्य जनता जिवाचे रान करत आहे. तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे.

विविध कर लादल्याने महागाई कमी होण्यास तयार नाही. पूर्वी गॅसची सबसिडी मिळत होती, आता सबसिडी न देता जनतेला खुल्या किमतीत गॅस खरेदी करावा लागत आहे. गॅसची किंमत 930 झाली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालवलेली असताना, महागाईने सर्वसामान्यांना भिक मागण्याची वेळ आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी कराव्या व जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव कमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24