अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीच्या वृत्तात तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ जाणार नाही.
आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही.
भाजपला केवळ सत्तेची स्वप्नं पडत आहेत. पण महाविकास आघाडी भक्कम आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचं वृत्त येताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
तर अमित शहांनी ‘सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगत येत नाही’ असं म्हणत सस्पेन्स वाढवला. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले.
साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते. पवार-शहा यांच्या भेटीच्या बातम्या उठवण्याचं काम भाजप करत आहे.
आमची महाविकास आघाडी तोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत्र असेही पाटील म्हणाले. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीदेखील अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या.
तर भाजप नेत्यांनी मात्र केंद्रातील नेतृत्वानं आदेश दिल्यास अंमलबजावणी करू, अशी भूमिका घेतली.
केंद्रानं छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेतला. त्यावरूनही पाटील यांनी केंद्रावर टीका केली.
एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो. तो काही असाच होत नाही. फाईलवर निर्णय झाला असणार.
पाच राज्यांच्या निवडणुका बघून त्या राज्यांत फटका बसेल, या भीतीने हा निर्णय मागे घेतला, असं पाटील म्हणाले.