अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का धक्का पोहोचविणारे आहेत.
सरकारने ही नियमावली तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडून दहशतीने सुरु असलेली वीज बिलांची वसुली चिड निर्माण करणारी असून,
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकार मंत्र्यांना पाठिशी घालतयं का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा बाहेर पडून आपली ताकद दाखवा, असा सल्लाही त्यांनी कॉँग्रेसला दिला.
आमदार विखे पुढे म्हणाले, राज्यात मंत्र्यांचे दौरे मोकाटपणे सुरू आहेत. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्यालाही गर्दी झालेली चालते. तिथे मात्र कोणतेही नियम नाहीत.
महाविकास आघाडी सरकारने नियमावली तयार करून एक प्रकारे राज्याच्या अस्मितेलाच धक्का देण्याचं काम केले आहे. ज्यांच्या आशिर्वादाने आणि ज्यांचे नाव घेऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले,
त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला नियमावली तयार होते, हे अतिशय धक्कादायक आणि चिड आणणारे आहे. सरकारने तात्काळ ही नियमावली मागे घेऊन राज्यातील जनतेला शिवजयंती साजरी करु द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.