मोदी अपयशी ठरले हे आता भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनाही समजले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत. हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे.

मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे, अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात.

म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले बोतल होते.

ते म्हणाले, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला पंतप्रधान मोदींनी वेग दिला आहे. दिडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे

असा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा पटोले यांनी दिला. तौक्ती चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

कोकणात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, नारळ, आंब्याच्या बागांसह मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेत आहेत. पंचनाम्याचे काम सुरु असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यात येईल.

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख दौरे करून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत आपण स्वतःही गुरुवारी कोकणाच्या दौ-यावर जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24