अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- 18 जुलैपासून राज्यात पूरस्थिती आहे आणि याच काळात भाजपचे नेते झारखंड सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पैसे देऊन आमदारांना विकत घेण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून रचले जात असून यामागे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला.
अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याने पोलीस चौकशीत ही माहिती दिल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तीन आमदारांना दिल्लीला बोलावण्यात आलं, दिल्लीत जयकुमार बेलखेडे या व्यक्तीने, जो नागपूर निवासी आहे,
त्याने या तीन आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेलं, तिथे या आमदारांशी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्री देखील गेला होता, हा माजी मंत्री म्हणजे विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
तसंच 21 जुलैला भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहित कंभोज पैसे घेऊन झारखंडच्या हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला,
पोलिसांनी या हॉटेलवर टाकलेल्या धाडीत मोठी रक्कम मिळाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. झारखंडमध्ये सरकार पाडण्यासाठी 50 कोटी आणि मंत्रीपद देण्याचं आमिष दाखवण्यात आल्याचं काँग्रेसचे आमदार सांगतायत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.