अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-कर्नाटकमधील भाजपचे विद्यमान खासदार बी. एन. बाचेगौडा यांचे पुत्र व अपक्ष आमदार शरद बाचेगौडा हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
तारीख निश्चित नसली तरी या महिन्याच्या अखेरपर्यंत आपण काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे गुरूवारी बाचेगौड यांनी स्पष्ट केले. येत्या २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता आहे.
भाजपसोबत बंडखोरी करत शरद बाचेगौडा यांनी २०१९ मध्ये होसकोट विधानसभा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवली होती. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार एम टी बी नागराज यांचा पराभव केला होता.
२०१९ मध्ये राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांमध्ये नागराज यांचादेखील समावेश होता. काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील काँग्रेस-जद(एस) आघाडीचे सरकार कोसळले होते.
या बंडखोर आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नागराज यांचा पराभव झाला होता.
भाजप खासदार बी. एन. बाचेगौडा यांच्यावर मुलगा शरद यांना निवडूण आणण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा आरोप झाला होते. मात्र, हे सर्व आरोप खासदार बाचेगौडा यांनी फेटाळून लावले होते.