अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. ‘यातच देशभर भाजपच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
आता जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी तर नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचं वादग्रस्त विधान केलंय..
भाजपाने मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा पटोले यांनी केलाय. मात्र पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यामधील राजकारण चांगलेच तापले आहे.
या वक्तव्याचा समाचार घेताना जालना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुजीत जोगस म्हणाले, “नाना पटोलेंची मस्ती वाढलीय. ती कशामुळे वाढलीय तर राज्यामध्ये अराजकता माजवणारं काँग्रेसचं सरकार आलंय.
त्यामुळेच नाना पटोलेंना बळ मिळालं आहे. याच कारणामुळे नाना पटोले देशातील आपल्या यशस्वी पंतप्रधानांना काहीही म्हणतायत. मारहाण करण्याची भाषा देखील बोलली गेली, ही चुकीची भाषा आहे
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “मी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आवाहन करतो की नाना पटोलेची जीभ कापणाऱ्याला एक लाख रोख रक्कमेचं बक्षिस आम्ही आज आमच्यावतीने घोषित करतो.
महाराष्ट्रामध्ये जो कोणी या नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला एक लाख रुपये भाजपा युवा मोर्चा जालनाच्यावतीने आम्ही रोख रक्कम स्वरुपात देणार आहोत,” असं जोगस यांनी म्हटलंय.