आमदार लंके यांच्या कार्याचे भाजपच्या ‘त्या’ महिला आमदारांकडून कौतुक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- विधानसभेतील सहकारी आमदार निलेश लंके हे कोरोना संकटाच्या काळात रुग्णांची करीत असलेली सेवा ही कौतुक व अभिमानास्पद असून त्यांचा आदर्श घेऊन

राज्यात कोव्हिड सेंटर सुरू करावेत असे सांगत आमदार लंके यांच्या कार्याचे चिखलीच्या भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी कौतुक केले.

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे सुरू असलेल्या अकराशे बेडच्या शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरला आमदार महाले यांनी भेट देऊन पाहणी केली.

येथील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार महाले म्हणाल्या की, विधानसभेतील सहकारी निलेश लंके हे कोरोना रुग्णांसाठी करीत असलेले कार्य आपण ऐकून होतो.

सर्वच सोशल मीडियावर आमदार लंके हे एकच नाव झळकत आहे. आज प्रत्यक्ष या कोव्हिड सेंटरला भेट देण्याचा योग आला.

विधानसभेतील आपले सहकारी करीत असलेले कार्य पाहून अभिमान वाटत असल्याची भावनाही आमदार महाले यांनी व्यक्त केली.

येथील कोव्हिड सेंटर हेच आपले घर व कुटुंब असल्याचे मानून कोणत्याही जात, धर्म विचारधारा असा दुजाभाव न करता मतदारसंघाबाहेरीलही रूग्णांचीही आमदार लंके हे अहोरात्र सेवा करून रुग्णांना उपचारांबरोबरच मानसिक आधार देऊन त्यांची काळजी घेण्याचे काम करीत आहेत.

कोरोना रुग्णांना मानसिक आधार देऊन त्यांची आपुलकीने विचारपूस केल्यास तो रुग्ण कोरोनावर मात करू शकतो. आणि हीच बाब ओळखून आमदार लंके हे रुग्णांना उपचाराबरोबरच मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.

आमदार लंके यांचा आदर्श घेऊन राज्यातही कोव्हिड सेंटर सुरू करावेत असे सांगत आमदार महाले यांनी आमदार लंके यांच्या सर्व सहकाऱ्यांनाही धन्यवाद दिले. लवकरात लवकर हे संकट दूर होवून पुन्हा जीवनमान पूर्ववत व्हावे अशी अपेक्षाही आमदार महाले यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24