कोपरगावात काळे गटाचा कोल्हे गटाला धक्का !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  कोपरगाव तालुक्यात मंगळवार (दि.९) रोजी पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाला अनपेक्षितपणे धक्का देत तालुक्यातील घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर कब्जा मिळवून सत्ता मिळविली आहे. मागील महिन्यात पार पडलेल्या एकूण २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुक पार पडल्या.

या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होवून मंगळवार (दि.९) रोजी एकूण २९ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी पार पडल्या. यापैकी घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीप्रसंगी पार पडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काळे गटाने घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचपदी आपल्या गटाच्या सदस्यांची वर्णी लावली.

ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका लालचंद जाधव, उपसरपंचपदी सोमनाथ जाकू झोरवर, घारीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव,उपसरपंचपदी ठकुबाई रामकिसन काटकर यांना निवडून आणून सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे. ओगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाचे ३ व कोल्हे ४ सदस्य निवडून आले होते. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनुसार सरपंचपदाच्या उमेदवार देखील कोल्हे गटाच्या निवडून आल्या होत्या.

मात्र कोल्हे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या अलका लालचंद जाधव व सदस्या मीनाबाई अण्णासाहेब कोल्हे यांनी एक दिवस अगोदरच आ. आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून काळे गटात प्रवेश केल्यामुळे ओगदी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच काळे गटाकडे गेले. अशीच परिस्थिती घारी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीप्रसंगी झाली. या ग्रामपंचायतीमध्ये काळे गटाचे चार व कोल्हे गटाचे पाच सदस्य निवडून आले होते.

मात्र कोल्हे गटाच्या सदस्या ठकुबाई रामकिसन काटकर यांनी देखील आ. काळे यांचे नेतृत्व मान्य काळे गटात प्रवेश केल्यामुळे बहुमताच्या जोरावर घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव व उपसरपंचपदी ठकुबाई रामकिसन काटकर यांची निवड करण्यात येवून या ग्रामपंचायतीवर देखील काळे गटाने आपला झेंडा रोवला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24