file photo

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- कोरोनाकाळात कोणी उपाशी राहू नये या उद्देशाने सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले . अनेक योजना सुरु केल्या तसेच प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काहींना मोफत, तर काहींना अल्पदरात धान्य दिले जात आहे.

मात्र काही लाभार्थी त्यांच्या नावावर घेतलेले धान्य दुकानदार, व्यापारी, इतर नागरिकांना विकत आहेत. म्हणजेच लाभार्थ्यांकडूनच रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

मोफत घेतलेले धान्य दहा रुपये किलो दराने विकले जात असल्याचा प्रकार जिल्ह्याच्या अनेक भागात सुरू आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना सरकारने मोफत धान्य दिले.

राज्य व केंद्राने घोषणा केल्याने लाभार्थींना दुप्पट धान्य मिळाले. अंत्योदय योजनेच्या एका लाभार्थींकडे एका महिन्याला ५० किलोच्या वर धान्य घरात येऊ लागले.

अनेक लाभार्थीं आवश्यक तेवढे धान्य ठेवून घेतात आणि इतर धान्याची बाजारात, दुकानात विक्री करतात. अंत्योदय व दारिद्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाते. मोफत, तसेच २ रुपये व ३ रुपये किलो मिळणारे हे धान्य १० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान याबाबत कारवाई करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना किंवा आदेश नाहीत. या प्रकारावर पुरवठा विभाग नियंत्रणही ठेवू शकत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळले तर त्यावर काय कारवाई करायची, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.