अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात रक्तपेढी आहे. या रक्तपेढीसाठी जिल्हा नियोजन मंडळाने मशिनरी खरेदीसाठी एक कोटी रूपये दिलेले आहे.
महापालिकेच्या मालकीच्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या मशिनरी तेथे आहे. रक्तपेढी बंद असल्याने या मशिनरी खराब होण्याचा धोका आहे.
महापालिकेची रक्तपेढी बेकायदेशीरपणे बंद करत तिला कुलूप ठोकण्यात आले आहे. रक्तपेढीचा खासगीकरणाचा डाव असून त्याविरोधात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तक्रार केली आहे.
बेकायदा रक्तपेढी बंद ठेवणार्याविरोधात कारवाई करावी अन्यथा शिवसेना आंदोलन करेल असा इशारा बोराटे यांनी दिला आहे.
रक्तपेढीसंदर्भात प्रशासनाने दिशाभूल करत तेथील डॉक्टर, स्टाफ नर्स, क्लॉर्क आणि टेक्निशिअनची इतरत्र बदल केली. अत्यावश्यक विभाग अशा पध्दतीने गत सात महिन्यापासून बंद ठेवण्यात आला आहे.
या रक्तपेढीचे खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. महापालिकेच्या रक्तपेढीतून गरजूंना साडेतीनशे रुपयांत रक्त उपलब्ध करून दिले जाते.
रक्तपेढी बंद असल्याने रक्तसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला तातडीने रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात आदेश द्यावेत.
तसेच बेकायदा रक्तपेढी बंद ठेवणार्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवसेना अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा बोराटे यांनी मंत्री शिंगणे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.