जिल्ह्यात भासू लागला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांना आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयांत वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत.

त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. उपलब्ध रक्तापेक्षा मागणी वाढल्याने रक्तपेढ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी शिबिरामध्ये रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये रिकामी झाली आहेत. गेल्या दोन-चार महिन्यांपासून कोरोनामुळे थांबलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते आहे.

याशिवाय शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसूतीमुळेही रक्ताची मागणी वाढली आहे. कडक निर्बंध हटविण्यात आल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ वाढली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच कोरोनामुळे दोन-तीन महिने रक्तदान ठप्प होते.

त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे नगर शहरातील रक्तपेढीच्या संचालकांनी सांगितले. कोरोना कमी झाल्यानंतर राज्यातही असाच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हे लक्षात घेऊन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान अत्यंत महत्वाचे असून रक्तदात्याने यासाठी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24