अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी उशिराचा ऊन्हाळी हंगामासाठी कांदा पिकाची निवड केली. मध्यंतरी कांद्याला चांगले बाजार भाव राहिल्याने मागील हंगामात झालेले नुकसान भरून निघेल या आशेवर कांदा पिकाची घेतले.
यासाठी बँक, पतसंस्था, नातेवाईक आदींकडून भांडवल उभा करून महागडे कांदा बियाणे खरेदी केले. चालू वर्षी कांद्याच्या बियाण्याने दहा हजाराचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्यांना वाढत्या दराचा भार सहन करावा लागला.
मात्र बोगस बियाणे बाजारात आल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून उत्पादन खर्च देखील येतो की नाही या चिंतेत शेतकरी असून याबाबतीत कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
शेवगावच्या पूर्व भागातील शेकटे खुर्द येथील शेतकरी भागवत मारकंडे यांनी आपल्या जमिनीत कांदा बियाण्याची रोपवाटिका तयार करून आपल्या शेतामध्ये कांदा लागवड केली. यासाठी लागणारे कांदा बियाणे त्यांनी एका बियाणे उत्पादक कंपनीकडून खरेदी केले.
मशागत, बियाणे खरेदी, खते व कीटकनाशक, कांदा लागवड असा मोठा खर्च झाला असून, ऐन पीकवाढीच्या अवस्थेत असतांना कांद्याला डेंगळे आल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येणार असल्याने झालेला खर्च देखील मागे येणार नाही.
यामुळे कांदा उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. याबाबतीत संबंधित कांदा उत्पादक कंपनी व बियाणे विक्रेते यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून पिकाची पाहणी करण्यात आली.
परंतु मदतीच्या बाबतीत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संबंधित शेतकरी यांनी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून,
नुकसान भरपाई मिळावी व संबंधित बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.