अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील परीक्षांमधील घोटाळे चांगलेच गाजू लागले आहे. यातच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली.
विशेष बाब म्हणजे अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यामुळे शिक्षण व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता.
याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे
तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह ३० ते ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली.
शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत असून २०१९-२०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षा राज्यातील १६ हजार ७०५ उमेदवारांनी दिली होती.
त्या सर्व उमेदवारांची ओएमआर शीटची तपासणी करण्यात आली. तपासणीत सात हजार ८८० अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले