अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघंाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहराजवळील घोडेगाव रोडवर आंबील ओढा परिसरात ऊसाने भरलेल्या
ट्रॅक्टरची व दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात राशीन येथे आरोग्य सेवक म्हणुन सेवेत असलेले नवनाथ विठ्ठल काशीद (वय- ३४) हे जागीच ठार झाले.
तर निमगाव खलु येथील शेतकरी सतिष किसन कातोरे (वय ५१ वर्ष) शेतामध्ये ऊसाचे पिकास पाणी देवून पायी घरी येत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत गंभीर अपघात होऊन जागीच मयत झाले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राशीन येथून ड्युटी संपवून दुचाकी (क्र.एम.एच.१६ बी.एक्स ८९३७) ने येत घरी श्रीगोंदा-घोडेगाव रोडने श्रीगोंदाकडे येत असताना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याचे सुमारास अंबालीका कारखान्याकडे जाणारा दोन टेलर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर( क्र. एम.एच.१६ बी.एम. ४५५५) यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या
अपघातात नवनाथ विठ्ठल काशीद हे जागीच ठार झाले. यावेळी ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे याने घटनास्थळावरून पोबारा केला. याबाबत मयताचे चुलते शंकर रामचंद्र काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालकावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या घटनेत निमगाव खलु येथील शेतकरी सतिष किसन कातोरे हे शेतामध्ये ऊसाच्या पिकास पाणी देण्यास गेले असताना रात्री ११ वा चे दरम्यान लाईट गेल्याने पाणी देऊन घरी निमगाव खलु येथे पायी येत होते.
ते रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक आलेल्या रेल्वेने त्यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या गंभीर अपघातात जखमी होवून जागीच मयत झाले. याबाबत शिवाजी सतिष कातोरे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.