अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्यासह देशभरात कोरोनाने धुमाकूळ माजविला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. अनेक वाड्यावस्त्या कोरोना बाधित होत आहेत.
एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांसमोर आता म्युकरमायकोसीस या आजाराचे संकट उभे ठाकले आहे. या आजाराने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेतला आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे म्युकरमायकोसीसचे दोन रूग्ण आढळले असून, या बुरशी जन्य आजाराने येथील एका ३५ वर्षीय तरूण शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. तर एक ५५ वर्षीय शेतकरी महिला रूग्णावर नगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
म्युकरमायकोसीस या आजाराने कर्जत तालुक्यात शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. म्युकरमायकोसीसच्या आजाराने तालुक्यातील हा पहिला बळी गेला आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या या शेतकऱ्यास मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती.
त्यानंतर म्युकरमायकोसीस या आजाराचा संसर्ग झाला होता. शस्त्रक्रिया दरम्यान त्याचा डोळा गमावला. दुर्दैवाने त्यातच त्याचे नुकतेच निधन झाले. तर दुसरीकडे ५५ वर्षीय महिला कोरोना बाधित झाल्यानंतर त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना देखील या बुरशीजन्य आजाराने पछाडले.
यात त्यांना दात व घसा या भागादरम्यान वेदना होत होत्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया दरम्यान त्यांना नऊ दात गमवावे लागले आहेत.
आता त्यांच्यावर अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजारातून उलगडण्याकरिता महागडी औषधे लागत असल्याने या कुटुंबियांनी या आजारापुढ हात टेकले आहेत.