अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत.
तर, २० कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं कंपनीचं नाव आहे. या केमिकल कंपनीत सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते.
या ४१ पैकी आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे.
आत मध्ये अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेल्याची माहिती आहे.
या ठिकाणी तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे त्या कंपनीच्या परिसरात पोहाचले आहेत.
दरम्यान, जेसीबीच्या मदतीने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याची माहिती समजत आहे. आग कशामुळे लागली अद्याप याबाबत ठोस असं कारण समजू शकलेलं नाही.
आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.