अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-पदभार स्वीकारताना राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पाटील यांनी गर्दी जमवून कोविड नियमांचे उल्लंघन केले.
या प्रकरणी संयोजकांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी केली आहे. अन्यथा आठ दिवसात राहुरी तहसील कार्यालयासमोरआमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
कुलगुरूंनी पदभार स्वीकारताना त्यांच्या स्वागत सोहळ्यात मोठी गर्दी जमविली असल्याचा आरोप जाधव यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनात म्हटले, कोविड काळात संसर्ग टाळण्यासाठी जमावबंदी आदेश जारी होता.
मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठातीलसभागृहात मध्यवर्ती परिसरासह अनेक अधिकाऱ्यांसह शिक्षक, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सुमारे 300 हून अधिक जमाव या ठिकाणी हजर होता. त्यामुळे कोविड काळातील नियमांची पायमल्ली करण्यात आली.
स्वागत सोहळ्यानंतर काही दिवसातच अनेक ठिकाणी मोठा संसर्ग झाला. याबाबत राहुरीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावरून तहसीलदारांनी विद्यापीठ प्रशासनाला चार पत्र पाठविली होती. त्यातील एकाही पत्राचे उत्तर मिळाले नाही.
त्यामुळे तीन महिने उलटूनही कोविड नियमांची पायमल्ली करणार्या संयोजकांवर कारवाई करण्यात आली नाही. लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आठ दिवसात राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.