बसपाचे राज्यव्यापी आंदोलन अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात होणार सहभागी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासाठी इंधन दरवाढ मागे घेण्याच्या विविध मागण्यांसाठी

बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 जुलैला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बसपाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली.

बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या निर्देशानुसार पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकिसाठी बसपाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदिप ताजणे, राष्ट्रीय महासचिव, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी खासदार विरसिंग, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, प्रदेश कार्यालयीन सचिव प्रा. अभिजीत मनवर आदिंसह पक्षाचे सर्व महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदिप ताजणे म्हणाले की, राज्य सरकार अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांच्या हित संवर्धन विरुद्ध काम करीत आहे. त्यांच्या वेळोवेळीच्या भूमिकांमधून हे सिद्ध झाले आहे.

अनुसूचित जाती-जमातीच्या पदोन्नती संदर्भात राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही या वर्गाच्या विरोधात केलेले ठळक कृती आहे. काँग्रेस आणि भाजप यांची भूमिका मुळात आरक्षण विरोधी असून आरक्षणासाठी त्यांनी केलेले आंदोलन पुतना मावशीचे प्रेम आहे.

त्यांचे या विषयावरील आंदोलने बनावट आहे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी जाणीवपूर्वक कुचकामी भूमिका घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकिला उपस्थित पदाधिकारी यांनी देखील बहुजन समाजाला एकवटून आपले असतित्व सिध्द करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

तर राज्य सरकार, केंद्र सरकार व इतर पक्ष बहुजन समाजाचा फक्त मतांसाठीच वापर करत असल्याची भावना व्यक्त केली. सदरचे आंदोलन राज्य सरकारने वीज बिल माफ करावे, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी ताजणे यांचे स्वागत करुन या आंदोलनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय सहभागी होणार असल्याचे सांगून, जिल्ह्यातील पक्षाच्या वतीने सुरु असलेल्या कामाची माहिती दिली.

13 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना नियमांचे पालन करुन धरणे आंदोलन केले जाणार आहे. बसपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24