अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात घुसून टेबलाच्या कप्प्यात ठेवलेले तब्बल ३ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केले.
ही घटना राहाता तालुक्यातील माळी नगर परिसरात घडली.याबाबत दगडू मारुती वाघे यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी वाघे हे राहाता तालुक्यातील साई श्रद्धा ,माळी नगरमध्ये राहतात.दि .१७ ते १८ या दरम्यान त्यांचे घर बंद होते.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडला व घरात घुसले . या चोरांनी घरातील सामानाची उचकापाचक करून टेबलाच्या कप्प्यात ठेवलेले सव्वा तीन लाख रुपये रोख रक्कम लंपास केली.
वाघे यांच्यानंतर याच परिसरातील साई श्रद्धा नगरमध्येच राहणारे संजय सपडू देसले यांचे घर फोडून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत .तसेच लोकरुची नगरमध्ये दत्तात्रय तुकराम सातपुते यांचे देखील चोरांनी घर फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे .
या प्रकरणी वाघे यांच्या फिर्यादी वरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोनि.भोये हे करत आहेत.