अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत नाहीय.
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ८९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा आता ७१ हजार ७४२ इतका झाला आहे. याबरोबर राज्यात आज ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
तर आतापर्यंत एकूण ४१ लाख ०७ हजार ०९२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६ टक्क्यांवर पोहोचले आहे.