अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-राज्यात करोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे बेहाल होत असताना दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काेराेना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवत असल्याने माेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
चार हजार रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल १८ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यात एका महिला नर्सचा समावेश आहे.
ईशा राजू जाधव, शुभम विजय नांदुरकर (रा. बुर्हाणनगर ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभम नांदुरकर याला पोलिसांनी आज पहाटे चार वाजता अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांच्या पथकाने नालेगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली आहे.
आरोपी हे मृत कोव्हिड रुग्णांच्या नावावर रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून ते चढ्या भावाने विक्री करत होते.
हे इंजेक्शन केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरच्या संलग्न असलेल्या मेडिकल मधून खरेदी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या मागची साखळी शोधून काढण्याचे काम पोलीस करत आहे.