अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकर्यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले.
बंदसाठी राष्ट्रवादीनेही ताकद लावल्याने पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात सारे व्यवहार ठप्प होऊ शकतात. गावागावांमधील एकही दुकान उघडे राहाता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेते त्यात सहभागी होतील. दरम्यान, बंद यशस्वी होऊ नये म्हणून भाजपनेही विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपच्या विविध संघटना किंवा कामगार संघटनांनी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपने जाहीर विरोध केला आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून अनेकांची रोजीरोटी हिरावली होती. आता पुन्हा तसाच प्रकार केला जात आहे, असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
आघाडीने पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून मुंबईसह राज्यातील व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला तर भाजप विरोध करेल.
दुकानदार, व्यापार्यांनी आघाडीच्या आवाहनाला भीक घालू नये. जर कोणी दंडेलशाही करून दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर भाजप रस्त्यावर उतरून दुकानदार, व्यापार्यांना संरक्षण देईल, अशी हमी त्यांनी दिली.