हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द; आमदार आशुतोष काळेंनी दिली माहिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादना मध्ये घट येते.पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबण्यात येत होती.

फळपिक विमा काढूनही अवर्षण परिस्थिती अथवा अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी हि हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द करावी यासाठी पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून हि फळपिक विमा योजनाच शासनाकडून रद्द करण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना दुष्काळ सदृष परिस्थितीला सामारे जातांना फळबागा वाचविणे शेतकऱ्यांपुढे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे.हवामानाच्या अशा प्रतिकूल परिस्थितीत फळपिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मदतगार म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतांना मागील वर्षी ५ जून २०२० रोजी शासनाकडून सुधारित फळबाग पिक विमा योजना ३ वर्षांसाठी जाहीर करण्यात आली होती.

या फळबाग पिक विमा योजनेमध्ये प्रमुख फळपिकांच्या धोके प्रमाणकेमध्ये बदल करण्यात आला होता.कोपरगाव विधानसभा मतदार संघात सलग २५ मिमी पेक्षा जास्त पाऊस दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त पडत नाही.

तसेच मतदार संघातील हवामान उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असल्याने सलग चार दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आर्द्रता टिकत नाही. त्यामुळे डाळिंब व पेरू या फळ पिकांसाठी मृग बहाराचे हवामान धोके कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना लागू होत नव्हते.

परिणामी फळपिक विमा काढूनही फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे नुकसान होत होते. याची दखल घेऊन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची समक्ष भेट घेऊन हि फळपिक विमा योजना मतदार संघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देऊन

हि योजना रद्द करावी याबाबत निवेदन देऊन कृषी विभागाकडे देखील पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने मागील वर्षी सुरु करण्यात आलेली पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द केली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24