अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनाला अटकाव करण्यासाठी आणि वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा भासतो आहे.
यातच कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत होता. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या शेकडो ज्येष्ठ नागिरकांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने त्यांची हेळसांड होत होती.
मात्र आता प्रशासनाने लसीकरणासाठी आता टोकन पद्धत सुरू केली आहे. दरम्यान शुक्रवारी कोपरगावमधील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना उपलब्ध असलेल्या १३० डोसनुसार टोकन देण्यात आले.
त्यानुसार फक्त तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी थांबणे अनिवार्य झाले. यापूर्वी नेमकी लस किती उपलब्ध आहे, आपला नंबर कधी येणार, यात बरेच नागरिक उशिरापर्यंत रांगेत ताटकळत उभे राहत होते.
त्यामुळे त्यांची खूप गैरसोय होत होती; परंतु टोकन पद्धतीनुसार आता उर्वरित नागरिकांना आपल्याला लस मिळणार की नाही हे लगेच समजणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या नवीन नियमानुसार आता वाट पाहत थांबण्याची गरज
नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड टळणार आहे. तसेच याच नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारी चीडचीड देखील टळणार आहे.