दिवसेंदिवस पत्रकारितेचे महत्त्व वाढत आहे त्याचबरोबर आपल्या जीवनातले माध्यमांचे स्थानही उंचावत आहे. या स्थानामुळे पत्रकारिता हे एक चांगले करिअर म्हणून बुद्धिमान तरुणांना आकृष्ट करत आहे.
विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठातील पत्रकारितेचे पूर्णवेळचे अभ्यासक्रम करणे परवडते. परंतु काही विद्यार्थ्यांना आवड असूनही पूर्णवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे आणि पूर्णवेळ देऊन तो अभ्यासक्रम शिकून घेणे या गोष्टी जमत नाहीत.
असे विद्यार्थी पत्रकारितेचे अल्पवेळचे अभ्यासक्रम शोधत असतात. त्यांचा हा शोध विचारात घेऊन भारतामध्ये शेकडो संस्थांनी पत्राद्वारे किंवा अर्धवेळचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
मात्र या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना धड थिअरीचाही अभ्यास नीट करता येत नाही आणि प्रॅक्टिकल करायला तर वेळच मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणाची हौस भागते पण प्रॅक्टिकलअभावी ते सक्षम पत्रकार होऊ शकत नाहीत.
अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी पत्रकार म्हणून नोकरीदेखील मिळवू शकत नाहीत. अशावेळी त्यांचा अभ्यासाचा वेळ आणि फी मात्र वाया गेलेली असते.
त्याचवेळी प्रॅक्टिकल करत करत पूर्ण केलेले पत्रकारितेचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना चांगले पत्रकार होण्यास अत्यंत उपयुक्त ठरत असतात. अशा प्रकारचे अभ्यासक्रम वृत्तपत्राच्या कार्यालयातच करता आले तर ते जास्त उपयुक्त ठरत असतात.
त्या दृष्टीने सध्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्र समूहाने मध्यंतरी एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला होता.
या अभ्यासक्रमात पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि दैनिकात काम करत करतच पत्रकारिता शिकवली जाते. या वृत्तपत्राने पत्रकार तयार करण्यासाठी ‘एक्स्प्रेस इ्स्टिटट्युट ऑफ मीडिया स्टडीज’ अशी स्वतंत्र संस्था उभी केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसबरोबरच इतरही काही वृत्तपत्र समूहांनी असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना थेट वृत्तपत्राच्या कार्यालयात कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळते.
दैनिक ‘भास्कर’ या वृत्तपत्राचाही असाच एक उपक्रम सुरू आहे. त्यांनी ‘भास्कर स्कूल ऑफ मीडिया स्टडीज’ ही संस्था निर्माण केली असून नुकतेच या संस्थेचे उद्घाटन झाले.
या संस्थेच्या प्रशिक्षणाची आखणी अमेरिकेतील ‘डेल कार्नेगी ट्रेनिंग कन्सल्टन्सस’ या संस्थेच्या मदतीने करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना खरोखरच प्रात्यक्षिकांद्वारे शिकण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा संस्थांमधून शिक्षण घेतलेलं चांगलं.