शिर्डी विमानतळावरून ‘कार्गो’ सेवा सुरू करावी – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- शिर्डी विमानतळा वरून लवकरात लवकर कार्गो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी. तसेच विमान उड्डाणांची संख्या वाढविण्यात यावी. अशा सूचना अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शिर्डी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या वतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी ‘पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन’ करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीची बैठक गुरूवार, दि.09 सप्टेंबर 2021 रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत समितीच्या विविध कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. शिर्डी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी मागील बैठकीतील ठराव व प्राधिकरणाने केलेल्या कामांचे सादरीकरण केले. यात एईएमसी (Airfield Environment Management Sub Committee) समितीची बैठक 8 सप्टेंबर 2021 रोजी शिर्डी विमानतळ येथे संपन्न झाली.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमानतळ परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये कचरा संकलन व विल्हेवाट प्रक्रिया राबवण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्हयाची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारण्याचे काम चालू आहे. पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविध प्रकारची कामे निरंतर सुरू आहेत.त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

परिसरात पशुपालन करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांना मृत्यू झालेल्या पक्षांचे विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. असेही श्रीवास्तव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.भोसले म्हणाले, सध्या जरी शिर्डी देवस्थान बंद असले तरी आजूबाजुच्या परिसरातील व्यापारी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कार्गो सेवा सुरू करण्यात यावी.

सध्या शिर्डी विमानतळ येथून 14 विमान उड्डाण फेऱ्या चालवल्या जातात त्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी. विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी नगर पंचायत आणि जिल्‍हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच विमानतळाच्या परिसरातून जात असलेल्या रस्ते व महामार्गाच्या महामार्गाच्या डागडुजीच्या कामाकाजासाठी केंद्रीय व राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात यावा.

अशा सूचना ही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शिर्डी विमानतळ टर्मिनल व्यवस्थापक एस.मुरली कृष्णा, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट दिनेश दहीवाडकर, शिर्डी विमानतळ परिचालन व सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, उप विभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,

तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद म्हस्के ,पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंभारे, कोपरगांव गटविकास अधिकारी सचिन सू्र्यवंशी, राहाता गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, कोपरगांव वन अधिकारी प्रतिभा सोनवणे,

इंडिगो एअरलाईनचे शिर्डी स्टेशन व्यवस्थापक आशिष अब्राहम, स्पाइसजेट एअरलाईन कृष्णा शिंदे, शिर्डी विमानतळ परिचालन पर्यवेक्षक प्रांजली खवले, शिर्डी विमानतळाचे विद्युत व दूरसंचार सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय देसाई, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील व श्री.वरपे आदी अधिकारी सहभागी झाले होते.