अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. तिसरी लाटही येण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक हानी होत आहे.
पैशाअभावी काहीना उपचार घेणेही शक्य होत नसल्याने अनेकांचा जीव या कोरोनाने गेला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना रुग्णांसाठी राज्यात सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयातही कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांचे प्राण यामुळे वाचणार आहे. आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यात कोरोना रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यात सोबत खासगी दवाखान्यातही कोरोना रुग्णांसाठी मोफत देण्याची योजना राबवावी,
अशी मागणी शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सध्या कोरोनाची दुसरी लाट चालू आहे. तिसरी लाट ही महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशा परिस्थितीमुळे कोरोना संसर्ग वाढला आहे.
आर्थिक अडचणीमुळे पैशाअभावी अनेकांचा मृत्यू यामध्ये झाला. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. बेड उपलब्ध झाले तर रेडमीसेवर इंजेक्शन मिळत नाही. या इंजेक्शनचा काळा बाजारही वाढला. अशा सगळ्या दुष्टचक्रात जनता सापडली.
वर्षभरापासून आम जनतेला रोजगार नाही, व्यवसाय बंद, उद्योग धंदे बंद हाताला काम नाही त्यामुळे एखाद्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर अशा कुटुंबाची मोठी धावपळ होते. नातेवाईकांकडून पैसे उपलब्ध करून सोने गहाण ठेवून काेरोना रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात.
मात्र खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांसाठी मोफत उपचार करावेत, अशी मागणी केली.